नागपूर : आठवडी बाजारातून अपहरण केलेल्या ७ वर्षीय चिमुकलीवर जंगलात नेऊन अत्याचार केला. वैद्यकीय तपासणीतून अशी धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणी कळमना पोलिसांनी आरोपीविरूध्द अपहरण आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. सुरेंद्र पराये (२९) रा. अजनी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने २ एप्रिल पर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली. आरोपी सुरेंद्र हा मुळचा बिडीपेठ येथील रहिवासी आहे. त्याला आई-वडिल आणि एक भाऊ आहे. तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. मात्र, पत्नी मुलांसह वेगळी राहते. तो दारू पिण्याच्या सवयीचा आहे. दारूच्या नशेत सात महिण्यापूर्वी त्याचा अपघात झाला होता. सध्या तो अजनी परिसरात राहात असून नुडल्स बनविण्याचे काम करतो. कामाला जाताच अॅडव्हॉन्स घेतो नंतर परत येत नाही.
घटनेच्या दिवशी तो दुचाकीने भटकत भटकत गुलशननगरातील आठवडी बाजारात गेला. पसंत केलेल्या कपड्याचे पैसे देतो अशी बतावणी करून चिमुकलीचे अपहरण केले. दुचाकीवर बसवून तिला जवळपासच्या जंगलात घेऊन गेला. अत्याचार केल्यानंतर तो अजनी परिसरात आला. त्याने दारू पिण्यासाठी एका मित्राला बोलाविले. दोघांनी दारू ढोसली. दरम्यान त्याच्या दुचाकीचे पेट्रोल संपले. तो दुचाकी ढकलत असताना चिमुकली रडत होती. दरम्यान पोलीस कर्मचारी चंदू ठाकरे हे घरी जात असताना सक्करदरा मार्गावर त्यांना हे दृष्य दिसले. तत्पूर्वी एका चिमुकलीचे अपहरण झाल्याचा संदेश वायलेसवर आला होता. ठाकूर यांनी सतर्कता दाखवित त्याची विचारपूस केली. संशय येताच पोलिसांना फोन केला. सक्करदरा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अपहरण उघडकीस आले.